उद्योगपती व किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे मालक नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली: भारतीय उद्योगपती नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी जपानच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेस वाडिया यांना होक्काइडो आयर्लंडच्या विमानतळावर २० मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर बाहेर येऊन ते भारतात परतले होते. नेस वाडिया यांच्याकडे २५ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. खासगी वापरासाठी आपण ड्रग्ज बाळगल्याची कबुली त्यांनी दिली होती.
जपानच्या न्यायालयाने मात्र ही शिक्षा ५ वर्षांसाठी निलंबित ठेवली आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात नेस वाडिया जपानमध्ये इतर कोणतं बेकायदेशीर कृत्य करताना आढळले तर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.
सन २०२० मध्ये टोकियो शहरात ऑलिम्पिकचे आयोजन होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानमध्ये अंमली पदार्थविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होत आहे.
नेस वाडिया हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती नस्ली वाडिया यांचे पुत्र आहेत. ते वाडिया ग्रुपचे एकमेव वारसदार आहेत. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे ते सह-मालक सुद्धा आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि गो एअर या कंपन्याही वाडिया ग्रुपच्या मालकीच्या आहेत. जवळपास ९१ हजार ७०० कोटी रुपयांच्या वाडिया ग्रुपच्या कंपन्या आहेत.
