College Pathways of Possibility 2
‘कॉलेज : पाथवेज आॉफ पॉसिबिलिटी’ जाणून घ्या विज्ञान आणि कलेची सांगड जीवनात का गरजेची?
”मी तुला “शांतिनिकेतन”चं प्रॉस्पेक्टस पाठवतोय. त्यातल्या १३व्या पानावर विषयांची यादी आहे. जे विषय कंपलसरी आहेत त्यात तू हिंदी आणि फ्रेंच या भाषा निवडाव्यास असं मला वाटतं. इतर अनेक आॉप्शनल विषय आहेत – जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीन विज्ञानातला एक आणि संगीत, फाईन आर्टस यामधल्या विषयांपैकी एक असे तू दोन विषय निवडावेस. आधुनिक जगाचा पाया विज्ञानावर बेतलेला आहे त्यामुळे मी विज्ञानातल्या विषयाबाबत आग्रही आहे. पण शांतिनिकेतनचा फाईन आर्टचा विभाग खूप चांगला आहे. त्यापैकी तुला ज्याची आवड असेल तो विषय तू निवड. तू तिथे जाऊन सगळे विभाग नजरेखालून घाल आणि मग निर्णय घे..” (१९३४ साली मॅट्रिक पास झालेल्या आपल्या मुलीला एका वडिलांनी लिहिलेलं हे पत्र.. )
”वर्ग सुरु झालेत. इतिहासाचा तास मला खूप आवडतोय. मी इंग्लिश, हिंदी, इतिहास, नागरिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय निवडले आहेत. हो.. आणि मी चित्रकला आणि नृत्य हे दोन विषयदेखील निवडले आहेत.” (मुलीनं १६ जुलै १९३४ रोजी शांतिनिकेतनमधून त्या पत्राला लिहिलेलं हे उत्तर)
जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यातला हा पत्रव्यवहार विज्ञानाबरोबरच कलेचं महत्व सूचित करतो. स्टॅनफर्ड विद्यापीठानं २०१४ साली कम्प्युटर सायन्स बरोबर इंग्रजी आणि कम्प्युटर सायन्सबरोबर संगीत असे दोन नवीन कोर्सेस सुरु केले होते. असं असलं तरी आपल्या देशात STEM म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मेडिकल – या चार शाखा सोडून कलाविषयक कोणत्याच शिक्षणाचं महत्व लोकांना वाटत नाही. “कॉलेज : पाथवेज आॉफ पॉसिबिलिटी” या आपल्या पुस्तकात सैकत मजुमदार यांनी विज्ञान आणि कला या दोन गोष्टींची सांगड किती गरजेची आहे हे उत्तमरीत्या मांडलं आहे.
मिशिगन विद्यापीठातल्या रॉबर्ट आणि मिशेल बर्नस्टीन या दोघांनी नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधकांना कला या विषयात असलेली गती आणि आवड यावर एक शोधनिबंध प्रकाशित केला. तो सैकत मजुमदार यांच्या पुस्तकातल्या विषयाला पुष्टि देणाराच आहे.
उदाहरणार्थ, रवींद्रनाथ टागोर हे कवी, कादंबरीकार, नाटककार, कथाकार, संगीतकार, चित्रकार, विज्ञानवादी आणि समाजवादी होते. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट विल्सन एक व्यावसायिक शिल्पकार होता. सर लॉरेन्स ब्रॅग हा भौतिकशास्त्रज्ञ चित्रकार आणि काष्ठशिल्पकार होता. “कलर थिअरी” शोधणारा ओस्टवाल्ड हा शास्त्रज्ञ स्वत: चित्रकार होता. इतर संशोधकांपेक्षा नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांना कलेची आवड किंवा छंद असण्याची शक्यता जवळपास तिप्पट असते असा बर्नस्टीनच्या शोधनिबंधाचा निष्कर्ष होता.
“कॉलेज” हे मजुमदार यांचं पुस्तक या दृष्टिकोनातून शिक्षणतज्ञ, शिक्षणविषयक समुपदेशक, विद्यार्थी, पालक आणि ज्या कोणाला देशापरदेशातलं उच्चशिक्षणाचं चित्र जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे. Last but not the least here is a quotation from the Great George Washington Carver.. ”I had an inordinate desire for knowledge and especially music, painting, flowers, and the sciences, Algebra being one of my favorite studies.”
नीलांबरी जोशी


(नीलांबरी जोशी ह्या मराठी साहित्य विश्वातल्या सध्याच्या आघाडीच्या लेखिका आहेत. “मनकल्लोळ भाग १ व २ (विषय – मानसशास्त्र)”, कॉर्पोरेट कल्लोळ (विषय – रंजक उद्योगविश्व आणि कर्मचारी व्यथा), झपूर्जा भाग – १,२,३ (विषय – साहित्य आणि समीक्षा, माहितीपर, मार्गदर्शनपर) तसेच “लाइमलाईट” (विषय – व्यक्तिचित्रण, चरित्र, चित्रपट) हि त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत.
