गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मतदान केंद्राजवळ भूसुरुंग स्फोट
गडचिरोली: जिल्ह्यातील कसनसून पोलीस ठाण्याच्या हद्दीतीस वाघेझरी मतदान केंद्राजवळ आज सकाळी साडेअकराच्या वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला. यामुळे सुदैवाने कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही.
वाघेझरी या केंद्रावर मतदान सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने येथे उपस्थित मतदार व पोलिस जवानांत एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या ठिकाणापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर मतदान केंद्र आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या मतदान केंद्रांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. या सर्व प्रक्रियेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज गडचिरोलीत मतदान होत आहे. नक्षल्यांचा विरोध झुगारून लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. याच दरम्यान नक्षल्यांनी स्फोट घडवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
