संयुक्त बैठकीनंतर नवाब मलिक म्हणाले स्थिर सरकार देऊ तर संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री शिवसेनेचाच
नवी दिल्ली: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी संपन्न झाली. ३ तासांहून जास्त वेळ ही बैठक चालू होती.
ही बैठक झाल्यानंतर नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, “गेल्या काही दिवसांत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासन ठप्प आहे, शेतकर्यांना मदत मिळू शकत नाही, त्यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांत आज सकारात्मक चर्चा झाली.”
यावेळी शिवसेनेसोबत लवकरच सरकार स्थापन होईल याचे सूतोवाच देताना ते म्हणाले आणखी काही मुद्द्यांवर चर्चेच्या फेऱ्या अजून सुरू राहणार आहेत. परंतु लवकरात लवकर स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल पुढे पडेल व गेले २१ दिवस जी अस्थिरता सुरू आहे ती संपुष्टात येईल.”
यानंतर संजय राऊत पत्रकार परिषद घेत म्हणाले की जेव्हा ३ पक्ष एकत्र सरकार बनवतात तेव्हा प्रक्रिया मोठी असते. ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. २-५ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण झाली की महाराष्ट्रात सरकार स्थापना होईल. पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री शपथ घेईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्र हाती घ्यावी, अशी माझी आणि राज्यातल्या जनतेची इच्छा आहे. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंशिवाय कोणताही पर्याय नाही.”
