नवी मुंबईतील उलवे विभागात कार्यरत “जाणता राजा ग्रुपचा” स्तुत्य उपक्रम; गरजूंना अन्नाच्या पाकिटांचे मोफत वाटप
उलवे/नवी मुंबई: राज्यात लॉकडाऊनमुळे जनजीवन पूर्णपणे थंड पडले आहे. ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधकाम मजूर, हमाल व तत्सम क्षेत्रातील लोकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. पण अशा या बिकट काळात काही सामाजिक संस्था अशा गरजूंच्या मदतीला धावून येताना पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारचा एक सामाजिक भान असलेला “जाणता राजा ग्रुप” सध्या नवी मुंबईतील स्मार्ट सिटी असलेल्या उलवे विभागातील सेक्टर – ९ मध्ये कार्यरत आहे. लॉकडाऊन नंतर येथील बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली. शिवाय काम बंद झाल्यावर आपापल्या जिल्हयात अथवा राज्यात जावं तर सर्व सीमाही बंद केल्यामुळे तो पर्यायही बाद झाला. अशाच या गरीब-गरजूंना जाणता राजा ग्रुप कडून रोज न चुकता जेवणाची पाकिटं दिली जात आहेत.
आमच्या प्रतिनिधीने या उपक्रमाबाबत या संस्थेचे प्रमुख असलेले संजय(भाऊ) जाधव यांच्याशी वार्तालाप केला. यावेळी ते म्हणाले की छत्रपती शिवरायांना जाणता राजा संबोधले जायचे त्याचे कारण की ते खरंच गोर-गरिबांचे दुःख समजू शकत होते. याच नावाने हा आमचा ग्रुप असून आम्हीही याच धारणेने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान पिचलेल्या या कष्टकऱ्यांना तयार अन्नाचे वाटप करून आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य निभावत आहोत. याकामी आम्हाला आमचे आधारस्तंभ रवीशेठ पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून इतर अनेक दानशूर व्यक्तींनी याकामी आम्हाला मोलाची मदत केली आहे.” पुढे ते म्हणाले की आम्ही नवी मुंबईकरांना आवाहन करतो की त्यांनीही पुढे येत या कामी छोटासा का असेना पण खारीचा वाटा उचलावा.”
