आसारामचा मुलगा नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी, ३० एप्रिलला सुनावणी
सुरत: बलात्कार प्रकरणातील आरोपी अध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला आज सूरत सत्र न्यायालयाने जहांगीरपुरा आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्याला ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईवर आहे. नारायणचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान हे देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहेत. पोलिसांनी पीडित बहिणींचे जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. आसारामविरोधात गांधीनगरमधील कोर्टात खटला सुरू आहे. नारायण साईविरोधात कोर्टाने आतापर्यंत ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.
ऑक्टोबर २०१३ मध्ये सूरत पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन घेतली. यामधील एक तक्रार ही आसाराम तर दुसरी तक्रार ही नारायण साई याच्याविरूद्ध होती. दोन बहीणींपैकी लहान बहिणीने नारायण साईवर आरोप केला होता. २००२ ते २००५ पर्यंत आपले सलग लैंगिक शोषण केल्याचा आरोप नारायणवर होता. यावेळी पीडित सूरत येथील आश्रमात राहत होती. नारायण साईवर आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. २०१३ मध्ये हरयाणा-दिल्ली सीमेनजीक नारायण साईला अटक करण्यात आली होती.
