मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत खा. नारायण राणेंनी गाजवली पत्रकार परिषद
मुंबई, दि.२६: कधीकाळी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांनी आज राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली. शिवसेनेच्या काल झालेल्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर विशेषतः पंतप्रधान, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी नारायण राणे व त्यांच्या पुत्रांचे नाव न घेता बेडूक असा उल्लेख केला.
या टिकेल उत्तर देण्यासाठी खासदार नारायण राणे आज भाजप कार्यालयात विशेष पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी उल्लेख करत अनेक वार केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १६ हजार कोटींचे उद्योग आल्याचा केलेला उल्लेख हा फक्त कागदावर आहे. अद्याप हे उद्योग सुरू न झाल्याचे ते म्हणाले. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे हे बेईमानी करून मुख्यमंत्री झाल्याचे म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर सेनेचे ५६ आमदार आल्याचेही ते म्हणाले. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी जे आरोपी गजाआड जातील त्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही असतील असे राणे म्हणाले.
एकूणच खासदार नारायण राणे यांची आजची पत्रकार परिषद ही तुफानी होती परंतु यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत राजकारणात घसरणाऱ्या नैतिकतेचे दर्शनच घडवून दिले.
