नांदेड तसेच परभणीत कडकडीत टाळेबंद; व्यापार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली ही मागणी
नांदेड: नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व बाजारपेठा आणि आस्थापना काल बंद असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात टाळेबंदी मागे घ्यावी, अशी मागणी लॉकडाऊन अत्याचार विरोधी कृती समितीनं जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे केली आहे. छोटे व्यापारी तसंच दैनंदिन मजूरीवर पोट अवलंबून असणाऱ्यांची आर्थिक स्थिती टाळेबंदीमुळे बिकट होत असल्याचं याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे.
परभणी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीलाही जिल्ह्यातल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळालं. लहान-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं काल बंद ठेवली होती.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत व्यापारी आस्थापनांना व्यवसायाची मुभा द्यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं व्यापारी काटेकोर पालन करतील, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
