बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
बेस्ट जनतेसाठीची अत्यावश्यक सेवा असून जनतेला सुव्यवस्थित सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बेस्ट समिती व मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या ठरावानुसार बेस्टचे सुनियोजीत व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर असून या जबाबदारीचे पालन महानगरपालिकेने करणे गरजेचे आहे. तसेच बेस्टच्या उत्पादनात अधिकाधिक वाढ होण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. कर्मचाऱ्यांचे पगार नियमित व्हावे. कामगारांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची महानगरपालिकेने दक्षता घ्यावी, असेही पटोले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बैठकीत बेस्ट उपक्रमातील अतिरिक्त मनुष्यबळाची कपात करू नये, कंत्राटाने बसवाहक कर्मचारी नियुक्त करण्याचा बेस्ट समितीचा निर्णय मागे घेण्यात यावा, विनावाहक बसगाड्या चालविण्याचा निर्णय रद्द करावा, सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अंतिम देयकाचे प्रदान तातडीने करण्यात यावे. बेस्ट कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता वेतनकरार करण्यात यावा याबाबत तसेच मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाशी संबंधित ‘क’ अर्थसंकल्पाचे विलिनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या अ अर्थसंकल्पात करणेबाबतचा प्रस्ताव शासनास लवकरात लवकर पाठवावा चर्चा झाली. कामगारांच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, कर्मचारी व्यवस्थापक शंकर नायर, बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अरविंद कादीनकर, जनरल सेक्रटरी शशांक राव, बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितिन पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
