उपमहापौरपदी मनीषा धावडे विजयी : प्रत्येकी १०७ मतं
सकाळी ११ वाजता पिठासीन अधिका-यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी झोननिहाय मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मनपाचे नगरसेवक व नगरसेविका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये जुळले होते. निगम सचिवांद्वारे प्रत्येक सदस्याचे नाव पुकारून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सदस्यांनी आपल्या आवडीच्या उमेदवाराला हात उंचावून मतदान केले.
यामध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार दयाशंकर तिवारी यांना एकूण १०७ मते प्राप्त झाली. तर काँग्रेसचे उमेदवार रमेश पुणेकर यांना २७, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार नरेंद्र वालदे यांना १० मते मिळाली. महापौर पदाच्या निवडणुकीत किशोर कुमेरिया, आभा पांडे, ऋषिकेश (बंटी) शेळके, गार्गी चोपरा, पुरूषोत्तम हजारे हे ५ सदस्य गैरहजर होते.
उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मनीषा धावडे यांनीही १०७ मते प्राप्त केली. तर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी धुर्वे यांना २६, बसपाच्या उमेदवार वैशाली नारनवरे यांना १० मते मिळाली. या निवडणुकीमध्ये किशोर कुमेरिया, आभा पांडे, ऋषिकेश (बंटी) शेळके, गार्गी चोपरा, पुरूषोत्तम हजारे, कमलेश चौधरी हे ६ सदस्य गैरहजर होते.
पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वाधिक १०७ मते प्राप्त झालेले दयाशंकर तिवारी यांची महापौर पदाचे व मनीषा धावडे यांची उपमहापौर पदाच्या विजयी उमेदवार म्हणून घोषणा केली.
मनोज गावंडे व मंगला गवरे यांचे उमेदवारी अर्ज मागे
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून अर्ज सादर केलेल्या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी प्रभाग ३३ ‘ड’चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. तर उपमहापौर पदाकरिता प्रभाग २८ ‘ब’च्या नगरसेविका मंगला प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. निवडणुकीच्या वेळी दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
