Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एम्स नागपूरच्या शरीरविज्ञान विभागाद्वारे १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आठव्या ‘असोपीकॉन-२०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १५ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन

नागपूर दि. ७ : नागपूरच्या मिहान येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था – एम्सच्या फिजीओलॉजी (शरीरविज्ञान) विभागाद्वारे १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान ‘असोसिएशन ऑफ फिजीओलॉजिस्ट ऑफ इंडिया – असोपीआय’ या संघटनेव्दारे आठव्या ‘असोपीकॉन – २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून एम्स मध्ये आयोजित ही पहिलीच आंतरराष्ट्रीय परिषद असणार आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एम्सच्या सभागृहात १५ ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती एम्स नागपूरच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी आज दिली . उद्घाटन सत्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

या परिषदेत चर्चासत्र, शोधपत्रिका सादरीकरण, विद्यार्थ्यासाठी व्याख्यानांच आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या आयोजन अध्यक्षा आणि एम्सच्या फिजिओलॉजी डिपार्टमेंटच्या प्रमुख तसेच शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल फाटक तर आयोजन सचिव डॉ. प्रथमेश कांबळे राहणार आहेत. अकॅडमी ऑफ फिजिओलॉजी आणि असोसिएशन ऑफ फिजिओलॉजी ऑफ इंडिया- असोपीआय हे या परिषदेचे सहआयोजक आहेत. ‘असोपीआय’ ही भारतातली आंतरराष्ट्रीय युनियन ऑफ फिजिओलॉजीकल सोसायटीची सदस्य असलेली भारतातील एकमेव संस्था असून या संस्थेमध्ये फिजिओलॉजी विषयाशी संबंधित अनेक दिग्गजांचा समावेश आहे

आठव्या ‘असोपीकॉन-2022’ या परिषदेची संकल्पना ‘व्यक्ती, विद्यार्थी, रुग्ण यांच्यासाठी फिजिओलॉजीच्या क्षेत्रातील दृष्टीकोन’ अशी आहे. परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ  फिजिओलॉजीसंदर्भातील विविध शैक्षणिक पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत. चार दिवस चालणा-या या परिषदेदरम्यान शरीरविज्ञानाशी संबंधित उपकरणांचे स्टॉल्स देखील लागणार आहेत यामाध्यमातून पदवीधर तसेच पदव्युत्त्तर विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन सादर करण्याकरिता एक मंच उपलब्ध होणार असून सुमारे १०० शोधपत्र  या परिषदेदरम्यान सादर होतील. परिषदेच्या नोंदणीसाठी https://assopicon2022.com/ या संकेतस्थळाची निर्मितीही करण्यात आली असून आठव्या ‘असोपीकॉन-२०२२’ परिषदेकरीता देश विदेशातून सुमारे ३०० प्रतिनिधींनी सहभागी नोंदणी केली असल्याची माहिती आयोजन अध्यक्षा डॉ. फाटक यांनी यावेळी दिली.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *