मुंबईत मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत; रेल्वे सेवांवरही झाला परिणाम
मुंबई दि.४: मध्यरात्री पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आज पाहायला मिळतंय. विशेषकरून पश्चिम उपनगरात पावसाने जास्त कहर केलेला दिसतोय. उपनगरीय रेल्वे सेवा पावसामुळे बाधित झाली आहे. याच सोबत किंग्ज सर्कल येथेही पहाटेच्या वेळेला पाणी ३ फुटांपर्यंत पाणी साचले होते.
कांदिवली येथे टाइम्स ऑफ इंडिया च्या कार्यालयाजवळ पश्चिम द्रूतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे येथे वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. या दुर्घटनेत आद्यप कोणतीच जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सध्या महापालिकेकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. प्रशासनाने नागरिकांना गरज नसेल तर बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
