३१० टन कोरोना प्रतिबंधक लसींची झाली वाहतूक
मुंबई, दि.९: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जानेवारी ते जून या कालावधीत १३९ आंतरराष्ट्रीय आणि ३९० हून अधिक देशांतर्गत विमानांद्वारे ३१० टन कोरोना प्रतिबंधक लसी रवाना करण्यात आल्या आहेत.
लसींच्या एकंदर मात्रांची संख्या १० कोटी ७१ लाखाहून अधिक होती. या लसींसह मुंबई विमानतळावरून आतापर्यंत १ हजार २३५ टन वैद्यकीय सामग्रीची ने-आण करण्यात आली. मुंबई विमानतळ प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.
कोविशिल्ड लस निर्मितीचं केंद्र पुण्यात असल्यामुळे लसीच्या जलद वाहतुकीसाठी मुंबई विमानतळ हे महत्वाचा दुवा ठरत आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या एअर कार्गो टर्मिनलची भूमिका यात महत्त्वाची होती.
या टर्मिनलमध्ये आशियातील सर्वांत मोठं तापमान नियंत्रित फार्मा एक्सलेंस सेंटर आहे. याशिवाय इम्पोर्ट कोल्ड झोन, स्वदेशी बनावटीचा कूलटेनर अशा सुविधा आणि कुशल कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यानं ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडता आली, असं मुंबई विमानतळाकडून सांगण्यात आलं.
या विमानतळावरून केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक लस वाहतूक करण्यात आली.
Source – AIR
