मुंबई महानगरपालिकेच्या माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा
मुंबई: सक्तवसुली संचालनालयानं काल महाराष्ट्रातल्या मुंबई महानगरपालिकेच्या माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात बेहिशोबी संपत्तीशी संबंधित काही दस्तऐवज जप्त केल्याची माहिती संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा छापा परकीय चलन कायद्यातल्या तरतुदींअंतर्गत टाकला होता.
या छाप्यात दुबईत भाडेतत्वावर दिलेल्या एका अवैध मालमत्तेसंबंधीचे दस्तऐवज हाती लागले असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या मालमत्तेतून वर्षाला १३ लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
याशिवाय हाती दस्तऐवजांनुसार या माजी अभियंत्यानं अमेरिकेची नागरिक असलेल्या, त्याच्या विवाहित मुलीच्या बँक खात्यात, ४० लाख रुपये हस्तांतरीत केले असल्याचं आढळून आलं असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
Credit – AIR
