रेल्वे प्रशासनाने ने हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय महिलांना उद्याचा प्रवास अशक्य
मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांमधे उद्यापासून महिलांना ठरावीक वेळेत क्यू आर कोडशिवाय प्रवासाची मुभा देण्याची विनंती राज्य सरकारनं रेल्वेला केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी तसं विनंती पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठवलं आहे. पण अद्याप रेल्वेने याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याचे कळते.
उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसंच रात्री सातनंतर शेवटच्या लोकलपर्यंत वैध तिकिटावर प्रवासाची मुभा द्यावी, क्यू आर कोड बंधनकारक असू नये, असं या पत्रात म्हटलं आहे. इतर वेळेतल्या प्रवासासाठी मात्र नेहमीप्रमाणे नियम लागू असतील.
याशिवाय, अत्यावश्यक सेवेसह ज्या ज्या घटकांना प्रवासाची मुभा आहे त्यांना ओळखपत्र आणि क्यू आर कोडचं बंधन कायम असणार आहे. त्यादृष्टीनं उपनगरी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची विनंती सचिवानी या पत्रात केली आहे. सध्यातरी हे राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला दिलेले विनंतीपत्र असून रेल्वे जो पर्यंत हिरवा झेंडा दाखवत नाही तो पर्यंत तरी समस्त महिलांना वेट अँड वॉच करावं लागणार इतकं नक्की.
