मुंबई, ठाणे सह नवी मुंबईकरांना विजेने दिला झटका; अचानक वीज गायब झाल्याने इस्पितळांची उडाली तारांबळ
मुंबई, दि.१२: महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. या काळात सर्व भार सर्किट २ वर होता. अचानक सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनके भागांत वीज गायब झाली. दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, ब्रांद्रा, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाला.
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाली असून बेस्ट, अदानी, एमएसइबीच्या भागात वीज नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता पण आता हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. मुंबईतील कोविड सेंटर मधील वीज पुरवठयाबाबत बोलताना कोविड टास्क प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, “सर्व महत्वाच्या दवाखान्यात पर्यायी व्यवस्था आहे, जनरेटर आहेत. बिघाड दुरुस्त होईपर्यंत जनरेटरचा वीज पुरवठा पुरेसा होईल. आणखीही आवश्यक ती पाऊलं उचलत आहोत सध्या चिंतेची बाब नाही.”
दरम्यान ठाणे, नवी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा पूर्वपदावर येत आहे.
