Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार

मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई, दि.१२: येत्या २२ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्यातील कोविड-१९ पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ११ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी पाळावयाची सर्व मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

याशिवाय चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहणाऱ्या येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची तपासणी करणे, आणि आत येणाऱ्या प्रेक्षकांचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे याबाबत आखणी करण्यात यावी. तसेच सिनेमागृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी सुद्धा घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळ्या पडद्यांवर दाखवले जातात, अशावेळी मध्यांतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरुन प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.

सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी जसे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुद्धा लसीकरण करणे आवश्यक आहे. शॉपिंग मॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरिवण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.

सिनेमागृहे ५० टक्के आसनक्षमतेने सुरु करण्यात येणार

सिनेमागृहे आणि मल्टीप्लेक्समध्ये ५० टक्के आसनक्षमता प्रेक्षकांची असेल. याचाच अर्थ दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात यावे. तसेच ५० टक्के आसनक्षमता असताना सिनेमागृहांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी प्रेक्षक बसणार नाहीत त्या खुर्चीवर क्रॉस मार्किंग करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तिकिट काढताना आणि तिकीट खिडकीवर तिकीट काढताना ज्या खुर्च्या बसू नये असे मार्किंग करण्यात आले आहे ते नमूद करणे आवश्यक आहे. सिनेमागृहांतील पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा आणि सिनेमागृहांतील लिफ्टमध्येसुद्धा गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समधील सिनेमांची वेळ वेगवेगळ्या ठेवल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यावे. तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये यासाठी डिजिटल पद्धतीने तिकीट बुकींगवर भर देण्यात यावा. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये तिकीट काढताना तिकीट खिडकीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक तितक्या तिकीट खिडक्या उघडण्यात याव्यात. मल्टीप्लेक्समध्ये सुद्धा प्लोअर मॅनेजमेंट करुन गर्दी टाळण्यात यावी.

चित्रपटगृहांमध्ये संपूर्ण जागेचे सॅनिटाईझेशन करण्यात यावे. सिनेमागृहांमधील प्रत्येक स्क्रिनिंग नंतर सॅनिटायझेशन करण्यात यावे. खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कर्मचाऱ्यांचे बसण्याचे ठिकाण, स्वच्छतागृहे यांची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी. सॅनिटायझेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देणे, बुट्स, ग्लोव्ह्ज, मास्क देण्यात यावे. कोविडचा संसर्गाचा एक तरी व्यक्ती आढळल्यास त्या जागेचे निर्जंतुकीकरण तात्काळ करण्यात यावे. सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. सिनेमागृहांमध्ये काम करणारे ज्येष्ठ कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांनीही आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असून या कर्मचाऱ्यांचे दोन डोसचे लसीकरण होऊन १४ दिवसांपेक्षा जास्त कालावधी असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी नियमित करावी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

याशिवाय सिनेमागृहांमध्ये मोक्याच्या ठिकाणी काय करावे आणि काय करु नये याची माहिती थोडक्यात नमूद करणारे बोर्ड लावणे आवश्यक आहे. हे बोर्ड स्वच्छतागृहे, तिकीट खिडकीजवळ, सिनेमागृहांमध्ये आत येताना, खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ असे लावणे आवश्यक आहे. तसेच सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना नियमांची माहिती करुन देण्यासाठी माहिती देणारा ऑडिओ संदेश देण्यात यावा. याशिवाय ठिकठिकाणी पोस्टर्स, स्टॅण्डीज यांची उभारणी करण्यात यावी. याशिवाय सिनेमा सुरु होण्यापूर्वी जनहितार्थ कोविड नियमांची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती ऑडिओ व्हिज्युअल क्लिप मधून देण्यात यावी.

सिनेमागृहांमधील एअर कंडिशन, व्हेंटीलेशन हे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार असणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील एअर कंडिशन २४ ते ३० सेल्सिअस तापमान इतका असावा. ह्युमिडीटीची रेंज ४० ते ७० टक्के असावी. सिनेमागृहांमध्ये हवा येईल तसेच क्रॉस व्हेंटिलेशन होईल हे पाहण्यात यावे. तसेच एक्झॉस्ट फॅन्सची सोय असावी. सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना पॅक्ड फुड  आणि पॅक्ड पेय उपलब्ध होतील. सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरु असताना खाद्यपदार्थ नेण्यास बंदी असेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *