स्वतःच्या पुतण्याकडून पवारांची हिट विकेट – पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र
वर्धा: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा वर्धा येथे झाली. या सभेत बोलताना मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
‘पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर टीका केली.
शरद पवार देशातील एक वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. ते कोणतेही काम करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात. देशातील वारे कुठल्या दिशेने वाहते आहे हे शरद पवार यांना समजले. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आणि अचानक राज्यसभेत खूश असल्याचे जाहीर केले, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
शरद पवार केंद्रात १० वर्षे कृषिमंत्री होते. मात्र, त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काहीही चांगले केले नाही, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.
त्याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर निशाणा साधत पवार कुटुंबात अंतर्गत वाद असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘स्वतःच्या पुतण्याकडूनच शरद पवारांची दांडी गुल्ल झाली. शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत.’ तसेच, अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाची आठवण नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी शेतीला पाणी हवे म्हणून आपल्या समस्या अजित पवार यांच्यापुढे मांडत होते तेव्हा अजित पवार काय म्हणाले तुम्हाला माहीत आहे ना?, ते काय म्हणाले हे मी व्यासपीठावरून बोलू शकणार नाही. कुणीही बोलू शकणार नाही.’
