मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर आता कॅपिंग बसवणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांना अँटीजन व अँटीबॉडी टेस्टला मान्यता
राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा वाढता वापर पाहता अनेक ठिकाणी या वस्तूंच्या किंमतीने उच्चांक गाठलेला दिसून आला आहे. मास्क आणि सॅनिटायझरसाठी कुठेही अवाजवी किंमत आकारली जाऊ नये म्हणून त्यावर कॅपिंग बसवण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. याआधी देखील खासगी रुग्णालयातील बेड चे दर, खासगी रुग्णवाहिका यांच्याकडून होणाऱ्या लुटमारीला आळा घालण्यासाठी त्यांच्या किमंतीवर कॅपिंग बसवण्यात आले आहे. अशाच प्रकारची कॅपिंग अन्न व औषध विभागाशी चर्चा करून मास्क आणि सॅनिटायझरवरही बसवण्यात येईल असे राजेश टोपे म्हणाले.
त्यासोबतच जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांना अँटीजन टेस्टला मान्यता देण्यात आली आहे. या टेस्टची किंमत ४५० रू. इतकी ठरवण्यात आली आहे. यातून जिल्ह्यात एखाद्या कंटेनमेंट झोनमध्ये किंवा खासगी रुग्णालयात अँटीजन टेस्ट करून अर्ध्या तासात रिपोर्ट घेता येऊ शकेल. अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ती व्यक्ती कोरोनाबधित आहे हे निदान लावता येऊ शकेल इतके या टेस्टचे वैशिष्ट्य असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
