Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

औरंगाबाद, दि. १७ : मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरूवात झाली. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यु पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांच्यासह, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. कुसुमाग्रजांच्या कवितेतील “एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार” ही ओळ उद्घृत करुन मुख्यमंत्री म्हणाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अशा ध्येयधुंद भावनांनी हैद्राबाद मुक्ती लढ्यासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्यही पत्करले अशा सर्व ज्ञात- अज्ञात स्वातंत्र्य सेनानी आणि वीरांगणांना आदरांजली अर्पण करतो. मराठवाडा मुक्तिसंग्राम हे आपल्या इतिहासातील  देदीप्यमान पर्व होते. आजच्या पिढीला या इतिहासाची माहिती देणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांचा मिळून हैद्राबाद मुक्तिसंग्राम कार्यक्रम असणार आहे. हैद्राबाद संस्थानवर निजाम मीर उस्मान अली यांचे राज्य होते. त्यांच्या राजवटीतून मुक्त होवून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदु, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण होते. या लढयातील सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे मोल करणे शक्य नाही असेही शिंदे म्हणाले.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मराठवाडा मुक्तिसंग्रामातील इतिहासावर आधारित कॉफी टेबल बुक, लोगो आणि डॉ. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या गितांची  ध्वनिमुद्रिका, तसेच मंगला बोरकर यांच्या ‘संघर्ष मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल अविनाश साबळे या क्रिडापटूला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *