मराठा आरक्षण प्रकरणी बुधवारी होणाऱ्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती गठीत
मुंबई: मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर येत्या ९ तारखेला होणाऱ्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही समिती जाहीर केली. विधीज्ञ आशिष गायकवाड, राजेश टेकाळे, रमेश दुबे पाटील, अनिल गोळेगावकर आणि अभिजीत पाटील या वकिलांचा या समितीत समावेश आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातले नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक तसेच संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांना समन्वय समितीतल्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेे आहे. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देणार आहे.
