पश्चिम बंगाल मध्ये ममता दिदींचा करिष्मा कायम; २०८ जागांवर आघाडी
कोलकाता, दि.२: गेले २ महिने पश्चिम बंगालचं राजकीय क्षितिज विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने भरून गेलं होतं. येथे अपेक्षेप्रमाणे केंद्रात सत्तेत असलेली भाजप व विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये थेट लढत झाली. आज निकालाच्या दिवशी अगदी पहिल्या फेरीपासून तृणमूल काँग्रेस ने आघाडी घेतलेली पाहायला मिळाली.
पश्चिम बंगाल मध्ये ताज्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेस २०८ जागी आघाडीवर असून भाजप ८० जागांवर किल्ला लढवत आहे. तर इतर २ ठिकाणी आघाडीवर आहेत.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप २०० चा आकडा पार करेल असा दावा केला होता. जो आजच्या निकालावरून सपशेल फोल ठरल्याचे दिसत आहे.
जाहीर होत असलेल्या निकालांवरून देशभरातून ममता बॅनर्जी यांच्यावर सर्व पक्षीय विशेषतः भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातून ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्याचवेळी भाजपला टोलेही लगावले. कोविड च्या वाढत्या रुग्णासंख्येने भाजपला या निवडणुकीत दणका दिला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
