Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे उद्घाटन

मुंबई, दि. २७: कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे असे सांगताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असे जाहीर केले. राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर आदी उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले, कोविडचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. तथापि या कालावधीत विभागाने कोविडनंतर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठीचे धोरण आणि नियोजन केले. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. या निमित्ताने आजवर दुर्लक्षित असलेल्या विभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आपण आपले वैभव जगासमोर आणत आहोत, हे करीत असताना नवीन पर्यटन स्थळेही विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या कामाच्या माध्यमातून ‘महा’राष्ट्र खऱ्या अर्थाने जगासमोर येईल, असा विश्वास व्यक्त करून सरकार कायम चांगल्या योजनांच्या पाठिशी राहील, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सर्वांगीण विकासासाठी पर्यटन’ हे घोषवाक्य सर्वार्थाने सार्थ ठरवणारी वाटचाल सुरू असल्याबद्दल पर्यटन विभागाचे कौतुक केले. राज्यात गड किल्ले, किनारपट्टी, साहसी पर्यटन, धार्मिक स्थळे, शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या चिपी विमानतळाचा कोकणातील पर्यटनाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटकांनी आधी महाराष्ट्र फिरावा, त्यानंतर इतरत्र जावे, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन विभागाला गरजेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महसूलमंत्री थोरात यांनी पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यात पर्यटन विकासाच्या सर्व बाजूंचा विचार होत असल्याबद्दल विभागाचे कौतुक केले. इतर देशांपेक्षा आपल्याकडे खूप काही आहे, हे जगाला दाखवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणापासून विदर्भापर्यंत असलेली विविधता जगासमोर आणताना स्थानिकांना विविध मार्गांनी रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोविडनंतर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या ८० वरून १० वर आणली, १५ ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होती त्याऐवजी आता केवळ नऊ स्व-प्रमाणपत्र आवश्यक केले. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. चिपी विमानतळापाठोपाठ कोकणात जागतिक दर्जाचे हॉटेल व्यावसायिक येण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे, ते जपत पुढील काही वर्षात ‘महा’राष्ट्र खऱ्या अर्थाने जगाला दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी विभागाच्या विविध प्रकल्पांची माहिती देऊन विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाराष्ट्र ही विविध संधींची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातच नव्हे तर जगभरात पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा विकास होत आहे. या संदर्भात जागृती निर्माण करत पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (UNWTO) ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे.

आजच्या कार्यक्रमादरम्यान मुंबई उच्च न्यायालय व मुंबई विद्यापीठाच्या इमारतींची ऐतिहासिक वारसा सफर या उपक्रमाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यानुसार, आता शनिवारी व रविवारी मुंबई उच्च न्यायालय तर सार्वजनिक सुट्या व सर्व रविवारी मुंबई विद्यापीठाच्या वास्तूत पर्यटकांना प्रवेश खुला केला जाणार आहे. ही संपूर्ण सहल टूर गाईड असोसिएशन प्रमाणित मार्गदर्शकांच्या सहकार्याने पार पडेल.

 संकेतस्थळ व ॲपचे उदघाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनाच्या सुधारित संकेतस्थळाचे व महाराष्ट्र टुरिझम या मोबाईल ॲपचे सुद्धा उदघाटन करण्यात आले. या संकेतस्थळाच्या सुधारित आवृत्तीत मराठी भाषेसह एकूण ९ विविध भाषांमध्ये पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तब्बल ३५० पर्यटनस्थळांची थीम नुसार वर्गीकृत करून माहिती देण्यात आली आहे.

यावेळी पर्यटन संचालनालयाच्या कोकण पर्यटन विभागाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील नव्या कार्यालयाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सहा विभागातील आकर्षक रंगछटांनी रंगवलेल्या सहा पर्यटन भिंतींचेही अनावरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रत्येक प्रदेशातील पर्यटक आकर्षणे, ऐतिहासिक वारसास्थळे, ख्यात व्यक्ती, कला आणि संस्कृतींचा मेळ घालणाऱ्या सुंदर कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते IITF (Incredible India Tourism Facilitator) अभ्यासक्रमांतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना तसेच फोटोग्राफी स्पर्धेतील व महाराष्ट्राचा मास्टरशेफ स्पर्धेतील विजेत्यांपैकी प्रत्येकी दोन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर पर्यटन संचालनालयाचे सह संचालक डॉ. धनंजय सावळकर व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी मागील काळात आखलेल्या नवनवीन योजना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी तसेच पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध विकासकार्यांसाठी केलेल्या कामाचे विशेष कौतुक करत त्यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रारंभी पर्यटन संचालनालयाद्वारे ऑगस्ट महिन्यात जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त समाज माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र थ्रू माय लेन्स’ या फोटोग्राफी स्पर्धेतील स्पर्धकांच्या विजेत्या फोटो प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले. पर्यटन संचालक बोरीकर यांनी प्रास्ताविकाद्वारे पर्यटन संचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सह संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार मानले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *