जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित
मुंबई, दि. १० : जनावरांमधल्या लंपी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण, सांसर्गिक रोगास प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. या अधिसूचनेचं पालन करण्याचं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी केलं आहे.
शासनाने ८ सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली. लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये ८ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील २९ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
गुरं आणि म्हशींच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, अंदमान, निकोबार, पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोग हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचं दिसून आलं आहे.
