लोकसभेच्या रिंगणात दिल्लीतील हा सर्वांत श्रीमंत उमेदवार
नवी दिल्ली: क्रिकेट नंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याला भारतीय जनता पक्षाकडून पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत विविध पक्षांचे मिळून ३४९ उमेदवार उभे आहेत आणि त्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गंभीरने मान पटकावला आहे.

२०१९च्या लोकसभेच्या रिंगणात गौतम गंभीर सर्वांत श्रीमंत उमेदवार आहे. त्याची एकूण संपत्ती १४७ कोटी इतकी आहे. २०१७-१८च्या प्राप्तीकर परताव्यात गंभीरने त्याचे उत्पन्न १२.४० कोटी असल्याचे जाहीर केले आहे, तर त्याची पत्नी नताशाच्या प्राप्तीकर परताव्यात ६.१५ लाखाचे उत्पन्न दाखवले आहे. उमेदवारी अर्ज भरताना गंभीरने आपली संपत्ती जाहीर केली आणि त्यात तो १४७ कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे समोर आले आहे.
गौतम गंभीर याने काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर गंभीर प्रचारसभेत व्यस्त झाला असुन त्याने मंगळवारी रोड शोही केला.
