विविध जिल्ह्यात टाळेबंदीला विरोध
राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊन ला व्यापारी वर्गाचा तसेच राजकीय पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या टाळेबंदीला वंचित बहुजन आघाडी पक्षानं विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, शहरात दोन जम्बो कोविड रुग्णालयं सुरू करावीत, खाजगी रुग्णालयात ५० टक्के खाटा सर्वसामान्यांसाठी आरक्षित ठेवाव्यात, या आणि अन्य मागण्यांचं निवेदन, आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांना सादर केलं.
मागण्या मान्य न केल्यास ११ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात लहान मोठ्या व्यापारी तसंच व्यावसायिकांना दुकानं चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात केणेकर यांनी, टाळेबंदीला व्यापारी वर्गाचा विरोध असल्याचं सांगितलं. प्रशासनाच्या सर्व नियम आणि अटींचं पालन करून व्यवसाय करण्याचं आश्वासन व्यापारी वर्गानं दिल्याचं, केणेकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.बुलडाणा शहरात राज्य शासनाच्या वतीनं लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी विरोधात, काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
व्यापारी बांधवांनीही यावेळी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं केली, तसंच दुकानं बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. सिंदखेडराजा इथं सर्व व्यावसायिकांनी टाळेबंदी विरोधात तहसीलदार तसंच मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं.
