श्रमेश बेटकर सोबत जुईली टेमकर प्रमुख भूमिकेत असून ‘प्लॅटोनिक’ प्रभाकर मोरेंची चित्रपटात हटके भूमिका
मुंबई, दि. २८: प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम हे कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर येतंच. कधी ते यशस्वी होतं, कधी अयशस्वी. पण प्रेम अनुभवण्याचा तो काळ आयुष्यभर लक्षात राहतो. अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट असलेला “लास्ट स्टॉप खांदा” हा संगीतमय चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हास्य जत्र फेम श्रमेश बेटकर लिखित ‘लास्ट स्टॉप खांदा’… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकर याने केलं आहे. प्रदिप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. अभिनेता श्रमेश बेटकर व अभिनेत्री जुईली टेमकर हे मुख्य भूमिकेत असून सोबतच निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. या चित्रपटाला संगीतकार श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे.
प्रेमाच्या नात्याचा वेध आजवर अनेक चित्रपटांमधून घेतला गेला आहे. तरीही प्रेम या संकल्पनेच्या नवनव्या गोष्टी चित्रपटांतून मांडल्या जातात. ‘लास्ट स्टॉप खांदा… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटातूनही अशीच एक नावीन्यपूर्ण कहाणी मांडण्यात आली आहे. या गोष्टीला श्रवणीय संगीताचीही साथ आहे. चित्रपटातून एक तरुण आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार असून प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाईल अशीच ही गोष्ट आहे. नव्या दमाचे कलाकार, उत्तम कथा, तांत्रिकदृष्ट्या सकस असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता २१ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
