काल मुंबई-ठाणे संदर्भात केले होते वादग्रस्त वक्तव्य
मुंबई, दि. ३० : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे पुनः एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. काल मुंबईत एका कार्यक्रमात त्यांनी गुजराती-राजस्थानी लोकांच्या योगदानाबद्दल बोलताना, “मुंबई-ठाणे भागातून गुजराती व राजस्थानी लोकांना बाजूला करा तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानी म्हणवली जाणार नाही” म्हणत वाद ओढवून घेतला. याआधीही कधी छत्रपती शिवाजी महाराज तर कधी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे कोश्यारी टीकेचे लक्ष्य झाले होते.
त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
ट्विट करत ते म्हणाले की, “महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..
ऐका .. ऐका…”
थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार असून त्यात ते कोश्यारी यांचा समाचार घेणार असल्याचे कळते.
