केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाबद्दल पंतप्रधानांची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
कोची: केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.
“केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधला आणि केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन घटनास्थळांवर कार्यरत आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांनी आपला जीव गमावला हे दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती शोकभावना” असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
केरळमध्ये अतिवृष्टींच्या बळींची संख्या पंचवीसवर गेली आहे. इडूकी जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे तिथे संकटग्रस्तांसाठी शोधमोहिम सुरु आहे. आता राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचं तसंच गरजेविना प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सजग असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. केरळमध्ये अतिवृष्टीने झालेल्या जिवीतहानीबद्दल उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे.
