रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी जाहीर करत केला कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द; ठेवीदार देशोधडीला
रिझर्व्ह बँकेने(RBI) कराड जनता सहकारी बँकेचा परवाना काल रद्द केला. या आदेशामुळे ठेवीदार, तसंच सभासदामध्ये खळबळ उडाली. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर करत बँक अवसायनात गेल्याचे जाहीर केले आहे. त्या बँकेवर उपनिंबधकाची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.
बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई इथं २९ शाखा आणि ३२ हजार सभासद आहेत. रिझर्व्ह बॅकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेत पाच लाखाआतील ठेवीदारांची रक्कम परत केली जाणार आहेत. त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
कराड जनता बँकेवर नोव्हेंबर २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आले. त्यानंतर ६ ऑगस्ट २०१९ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक झाली होती. कराड शहर पोलिसात कराड जनता बॅकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर तब्बल ३१० कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
