अखेर विकीलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याला अमेरिकच्या हाती सोपवण्यास ब्रिटनची मंजुरी
विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांज याचं अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्याचं इंग्लंडने काल मान्य केलं असून इंग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी काल प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली. तत्पूर्वी लंडनच्या न्यायालयाने एप्रिलमध्ये असांज याच्या प्रत्यार्पणाचा औपचारिक आदेश निर्गमित केला होता.
दरम्यान, हा प्रत्त्यार्पणाचा निर्णय म्हणजे माध्यम स्वातंत्र्याच्या दृष्टीनं काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया असांज याच्या विकिलिक्स संघटनेनं व्यक्त केली आहे. असांजच्या कायदेशीर सल्लागार जेनिफर रॉबिन्सन यांनी या निर्णयाविरोधात स्ट्रासबोर्ग इथल्या युरोपच्या मानवी हक्क न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला आणखी काही महिन्यांचा अवधी लागण्याची चिन्हं आहेत.