“जनतेसाठी असलेले माझे आंदोलन दडपविण्याचे षडयंत्र” – अॅड. निशांत घरत
उपोषणकर्ते अॅड. निशांत घरत यांची प्रकृती खालावली, पोलिसांवरही केले गंभीर आरोप
उरण, दि. २६(विठ्ठल ममताबादे): जेएनपीटीच्या कर्मचारी मनीषा जाधव यांचे निलंबन करून त्यांच्या कागदपत्रांची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार करून उपोषणाला बसलेल्या निशांत घरत यांना आज दिनांक २६/३/२०२२ रोजी सकाळी ७ वाजता आरोग्य तपासणी आहे असे सांगत पोलिसांनी ताब्यात घेतले. २६/३/२०२२ रोजी उपोषणाचा ६वा दिवस आहे. दिनांक २१/३/२०२२ रोजी हे उपोषण सुरु झाल्याने निशांत घरत यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र प्रशासनाने अजूनही या उपोषणाची दखल न घेतल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त केले जात आहे. एकाही अधिकाऱ्याने येथे ढुंकून सुद्धा बघितले नाही. उलट उपोषणकर्ते निशांत घरत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व रक्ताची चाचणी करण्यासाठी वाशीला नेले. मात्र निशांत घरत याच्या आंदोलनापुढे कोणाचेही चालले नाही. निशांत घरत यांच्या पत्नी मनस्वी घरत यांना पोलिसांनी उपोषण स्थळी मारहाण केल्याचा आरोप निशांत घरत यांनी केला असून पोलीस कर्मचारी तांबोळी व त्यांचे साथीदार पोलीस कर्मचारी व जेएनपीटीचे कर्मचारी यांच्या विरोधात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर येथे तक्रार केली आहे. या तक्रारी द्वारे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निशांत घरत यांनी केली आहे.
मनीषा जाधव यांचे निलंबन करणे, शासनाच्या नियमानुसार नवीन शेवा गावासाठी ३३ हेक्टर जागेचे वाटप आणि वाढलेल्या कुटुंबांसाठी वाढीव गावठाणसाठी शासनाच्या नियमानुसार जागा सुपूर्द करणे, सेझ आणि नवीन येणाऱ्या प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांना प्राधान्याने नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. प्रथम प्राधान्य ज्याच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे त्यांना, द्वितीय प्राधान्य त्या गावातील लोकांना, तृतीय प्राधान्य उरण तालुक्यातील तरुणांना मिळाली पाहिजे या मागण्यासाठी निशांत घरत यांचे उपोषण सुरु आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धारही निशांत घरत यांनी केला आहे. यावेळी उपोषणस्थळी नवीन शेवा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. जनतेच्या कल्याणासाठी असलेले हे आंदोलन सूडबुद्धीने संपविण्याचा प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आता कदापि पाठीमागे हटणार नाही असे सांगत आपला निर्धार निशांत घरत यांनी व्यक्त केला.
