“अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे” – जयंत पाटील यांची टीका
मुंबई, दि.२४: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राहत्या घरी व इतर १० ठिकाणांवर सीबीआय ने आज सकाळी धाडसत्र सुरू केले. देशमुख यांची तर जवळपास ६ तास चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची बाजू मांडली. ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते.
या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.”
