द नेम इज बॉण्ड.. जेम्स बॉण्ड..!
‘मला या क्षेत्रात यश मिळेल का?’ असा प्रश्न ‘अॅझक्शन ऑफ द टायगर’ या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यावर शॉन कॉनरीनं टेरेन्स यंग या आपल्या दिग्दर्शकाला विचारला होता. त्यावर यंगनं ‘या चित्रपटानं तुला यश मिळणार नाही. पण तुला पोहता येतं का? ते येत असेल तर चालू ठेव. मी तुला चांगला रोल देईन’ असं एक विचित्र भासणारं उत्तर दिलं होतं.
यानंतर चार वर्षांनी इयान फ्लेमिंगच्या जेम्स बाँड या व्यक्तिरेखेवर आधारित एक चित्रपट काढायचा असं यंग ठरवत होता. डेव्हिड निव्हन, रेक्स हॅरिसन आणि कॅरी ग्रांट या तीन अभिनेत्यांपैकी कुणाला तरी ‘००७ जेम्स बाँड’ या गुप्तहेराची भूमिका द्यावी असं यंगच्या मनात होतं. मात्र या तिघांनाही त्या भूमिकेत रस नव्हता. तेव्हा अल्बर्ट ब्रोकोली या चित्रपटनिर्मात्याची बायको डाना हिला शॉनचं मर्दानी रुप या भूमिकेसाठी योग्य वाटलं. डानाच्या सांगण्यावरुन यंगनं शॉनसमोर मग ‘००७ जेम्स बाँड’ची भूमिका करायचा प्रस्ताव ठेवला आणि शॉननं तो प्रस्ताव मान्य केला. शॉनच्या या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्टस् घेऊन यंगनं मग अमेरिकेत ‘युनायटेड आर्टिस्टस्’ या स्टुडिओकडे पाठवल्या. बऱ्याच उलथापालथींनंतर शेवटी हा चित्रपट करायचा ठरवला आणि १९६१ साली शॉननं जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी सहा वर्षांचा करार केला. शॉनला बाँडच्या वागण्याबोलण्याचं प्रशिक्षण देणं चालू झालं. आणि ‘अँड रेस्ट इज हिस्ट्री’ अशा पध्दतीनं जेम्स बाँड म्हणजे शॉन कॉनरी हे समीकरण रुढ झालं!

जानेवारी १९६२ मध्ये उर्सुला अँड्रेस या सहनायिकेबरोबर ‘डॉ. नो’ या पहिल्यावहिल्या बाँडपटाचं चित्रीकरण चालू झालं. ‘डॉ. नो’ ५ ऑक्टोबर १९६२ रोजी लंडन आणि ८ मे १९६३ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. एकट्या इंग्लंडमध्ये ‘डॉ. नो’ या चित्रपटानं ८.४ लाख डॉलर्स मिळवले. १० लाख डॉलर्समध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं १९६५ पर्यंत ६० लाख डॉलर्स कमावले होते. उर्सुला अँड्रेसया अभिनेत्रीनं या चित्रपटात बिकीनी घालून समुद्रातून एंट्री घेतली होती! तिचा तो बिकीनी २००१ साली ६१५०० डॉलर्सना विकला गेला होता.
बीटल्स या चार गायकांच्या ग्रुपनं जसा त्या काळात जगभरात विचारांमध्ये आणि जीवनशैलीत बंडखोरपणा आणला होता, तसंच ऐषोआराम उाभोगणारा आणि रूढीबध्द सांकेतिक जुनाट कल्पनांना शह देऊन मनमुराद जगणारा बाँडही लोकांना भयंकर आवडला होता.

‘गोल्डफिंगर’ हा जेम्स बाँडचा तिसरा चित्रपट लंडनमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा मास हिस्टेरिया म्हणजे काय असतो याचीच शॉनला प्रचीती आली. १५ आठवड्यात या चित्रपटानं लंडनमध्ये २० लाख डॉलर्स कमावले होते. अमेरिकेत तर शॉन पहिल्या क्रमांकावर जाऊन बसला होताच मात्र जपानमध्येही तेव्हा तो बीटल्सपेक्षा जास्त गाजत होता.
लहानपणी दोन खोल्यांच्या घरात राहून उदरनिर्वाहासाठी दूध विकून कसेबसे पैसे मिळविणाऱ्या शॉनला ‘सर’ हा किताब, २ ऑस्कर्स आणि बॉक्स ऑफिसवर १५० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळाले होते. ‘पीपल’ मासिकानं त्याला विसाव्या शतकातला ‘सर्वात सेक्सीएस्ट मॅन’ असा किताब दिला होता.
जेम्स बॉण्ड अनेकजणांनी नंतर साकारला.. पण सर शॉन कॉनरी यांची सर कोणालाच नाही.
– नीलांबरी जोशी
