उद्धव ठाकरे व कॉंग्रेसकडून निषेध जाहीर
मुंबई, दि. १४: आयकर विभागाने ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसी च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये धाड टाकली आहे. अशी माहिती आहे की, १२-१५ जणांची टीम बीबीसीच्या दिल्ली कार्यालयात तपासणी करत आहे. किती ठिकाणी शोध सुरू आहे ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. आयटी विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात कागदपत्रे तपासत आहेत. कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना फोन न वापरण्यास सांगण्यात आल्याचे कळते. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच खोलीत ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसने या कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटावरून नुकत्याच झालेल्या वादाला जबाबदार धरले आहे. पक्षाने या निर्णयाला अघोषित आणीबाणी म्हटले आहे. काँग्रेसने ट्विट करून बीबीसीची माहितीपट आधी आला, त्यावर बंदी घालण्यात आली असे म्हटले आहे. आता आयटीने बीबीसीवर छापा टाकला आहे.
चालू धाडीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो, त्यामध्ये न्यायव्यवस्था, प्रशासन, शासन यांच्यासह महत्त्वाचा स्तंभ म्हणजे माध्यम असतो. मी तुमच्याशी बोलत असताना या बातमीसोबतच बीबीसीच्या कार्यालायवर प्राप्तिकराची लोक गेली आहेत, ही सुद्धा बातमी सुरू असेल. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? म्हणजेच काय, आम्ही वाटेल ते करू पण आवाज नाही उठायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही जी पाशवीवृत्ती आपल्या देशात आज फोफावायला बघते आहे, ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपूर्ण देश खावून टाकेल.”
पहले BBC की डॉक्यूमेंट्री आई, उसे बैन किया गया।
अब BBC पर IT का छापा पड़ गया है।
अघोषित आपातकाल
— Congress (@INCIndia) February 14, 2023
