देशातील महिलांसाठी खुशखबर; सैन्यदलात पहिल्यांदाच महिला सैनिकांची ऑनलाईन भरती
नवी दिल्ली: भारतीय लष्करात (Indian Army) पहिल्यांदाच महिलांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. सैन्यदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारची महिला सैनिक पोलीस पदाची भरती होत आहे.
जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती. यानुसार ही भरती आयोजित करण्यात आली असून आजपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. महिलांच्या सैन्य भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात हिंदुस्थानच्या सैन्यदलाच्या https://www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
महिलांना सैनिक पोलीस दलामध्ये २० टक्के प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी प्रसार माध्यमांना दिली. सध्या या विभागात जनरल ड्युटीसाठी १०० पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांची उंची १४२ सेंटीमीटर आणि वय १७ ते २१ वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांमधून निवडक उमेदवारांना शारीरिक आणि लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येईल.
महत्वाचे म्हणजे केवळ लग्न न झालेल्या मुलीच यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच घटस्फोटीत, विधवा स्त्रिया ज्यांना अपत्य नाही अशाही महिला अर्ज करू शकणार आहेत. तसे प्रतिज्ञापत्र फक्त लिहून द्यावे लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ८ जून आहे. तर वाट कसली पाहताय. जर असेल तुमच्यात जोश काहीतरी थ्रिलिंग जॉब करण्याचा तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा.
