ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा ६ गडी राखून पराभव
अहमदाबाद, दि. १९: विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ६ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात डावखुरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची शानदार खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय लॅबुशेनने ५८ धावा केल्या. जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच भारतावर वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद ठरले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर सर्वबाद झाला. २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत सामना जिंकला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली.
सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या मार्नस लॅबुशेनच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली, ज्यासमोर भारताचे सर्व गोलंदाज अपयशी ठरले. हेडने शतक तर लॅबुशेनने अर्धशतक झळकावले. दोन्ही फलंदाजांनी हुशारीने डाव पुढे नेत कांगारू संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, ट्रॅव्हिस सामना जिंकण्यापूर्वी बाद झाला. भारताचा विराट कोहली हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
