
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्य मंत्री भानु प्रताप सिंग वर्मा यांनी सीबीआरटीआय, पुणेच्या कामाची केली प्रशंसा
पुणे, दि. २०: महात्मा गांधी यांचा दृष्टीकोनानुसार प्रत्यक्ष काम करतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधमाशीपालनाच्या महत्त्वावर भर दिला आहे आणि ते म्हणाले आहेत: “श्वेत क्रांती सह मधुक्रांती देखील आवश्यक आहे”. हा संकल्प पुढे नेत, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी), मधमाशी पालक आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी मिशन मोडवर मधमाशी पालनाचा उपक्रम हाती घेतला आहे.
लोकांना निरोगी ठेवण्यामध्ये आणि विविध आव्हानांवर उपाय शोधण्यामध्ये मधमाशा आणि इतर कीटक बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी दर वर्षी २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने जागतिक मधमाशी दिनानिमित्त पुणे इथल्या केव्हीआयसीच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (CBRTl), मधमाशी संवर्धन आणि मध प्रक्रियेशी संबंधित विविध कार्यक्रम आयोजित करून आपला हीरक महोत्सव साजरा केला.
यावेळी हनी पार्लरचे (मध केंद्र) उद्घाटन आणि प्रदर्शन, साधनांचे वितरण, स्मरणिका प्रकाशन, केव्हीआयसीच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रवासावरील लघुपटाचे प्रकाशन, आणि मधमाशीपालन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल शास्त्रज्ञ, मधमाशीपालक आणि आयोगाच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण, हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मधमाशी पालकांना 800 मध संकलन पेट्यांचे वाटप करून कार्यक्रमाची डिजिटल सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, यावर्षी 1,33,200 मेट्रिक टन मधाचे उत्पादन झाले असून मधाची विक्री 30,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पीएमईजीपी योजनेअंतर्गत सुमारे 300 कोटी रुपयांचे अनुदान (रु. 299.97) वितरित करण्यात आले.
यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानुप्रताप सिंह वर्मा म्हणाले की, सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) एक तृतीयांश योगदान देत आहे आणि एकूण निर्यातीत ४८% योगदान देत आहे. यामुळे लोकांचे दरडोई उत्पन्न ८५०० वरून १.९५ लाख वर गेले आहे, असेही ते म्हणाले.
पुणे इथल्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षा निमित्त प्रशंसा करताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री म्हणाले की, या संस्थेने आर्थिक स्वावलंबना बरोबरच मधमाशी पालन आणि मध उत्पादनामध्ये मोठा पल्ला गाठला आहे.
केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचेही त्यांनी यावेळी प्रकाशन केले.मधमाशीपालन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शास्त्रज्ञ, मधमाशीपालक आणि आयोगाचे कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
खादी आणि ग्रामोद्योगचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी, खादी आणि ग्रामोद्योग आयोग देशातील मधमाशीपालकांना स्वावलंबन आणि मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या मधमाश्या वाचवण्याचे कार्य करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी हा उत्सव साजरा करत असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ऑगस्ट 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्वेतक्रांतीबरोबरच मधुक्रांतीचीही गरज आहे अशी साद दिली होती. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने या पारंपारिक मधमाशी पालन उद्योगाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “हनी मिशन” विकसित केले गेले आहे आणि ‘हनी मिशन’ सुरू झाल्यापासून 2017-18 या वर्षात 1,86,000 हून अधिक मधमाश्यांच्या पेट्या वितरित केल्या आहेत आणि 18,600 लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे कृषी उत्पादनात 25 ते 40% पर्यंत वाढ झाली आहे. त्यांनी खादी कारागिरांच्या मजुरीमध्ये 35% वाढ करून त्यांच्या उत्पन्नात 150% वाढ करण्याची घोषणा केली. 819 लाभार्थ्यांना जवळजवळ 300 कोटी रुपये (299.97 रुपये) वितरित करण्यात आलेल्या तारण रक्कम अनुदानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्याअंतर्गत जवळजवळ 948 (947.60) कोटी रुपये कर्ज म्हणून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे 54,552 म्हणजेच जवळजवळ 55 हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने 50,000 हून अधिक लोकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले आहे, असे ते म्हणाले.
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “लोकल टू ग्लोबल” मोहीम यशस्वी करण्यासाठीचा एक व्यापक उपक्रम आहे, असे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणार्या उच्च-गुणवत्तेच्या मधाच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रातील कारागिरांच्या उत्पन्नाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.