अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची हजेरी
हवामान विशेष: अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती आजही कायम आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे हवेतला गारठा अचानक वाढल्यानं आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची भितीही व्यक्त होत आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरात काल रात्रीही पावसाची संततधार कायम होती. या भागांत आज सकाळी पावसानं काहीशी उसंत घेतली होती. मात्र ढगाळ वातावरण कायम असून, काही ठिकाणी अधूनमधून पावसाची रिपरीप सुरु आहे. अवकाळी पावसानं या भागांतलं तापमान अचानक घसरून गारठा वाढला आहे.
सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसानं आज सकाळी पुन्हा जोर धरला. आंबा आणि काजुला मोहोर धरण्याच्या काळात पाऊस पडल्यानं बागायतदार धास्तावले आहेत, तर अनेक ठिकाणी कापणी केलेली भात आणि नाचणीची पिकं भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं कळतं.
धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कापूस, कांदा भिजून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
सांगली काल रात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. आजही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसला असून, पिकं वाचवण्यासाठी फवारणीचा खर्च वाढून, उत्पादन खर्चही वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड कामगारांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक कामगारांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यानं, संसार पाण्याखाली गेले आहेत.
