हेमा मालिनी निवडणूक प्रचारासाठी थेट गव्हाच्या शेतात
नवी दिल्ली: निवडणूक म्हटलं की उमेदवार काय करतील याचा काही नेम नाही. तसंच काहीच आगळंवेगळं चित्र मथुरामध्ये निर्माण झालंय.
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांना भाजपातर्फे मथुरा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर हेमा मालिनी यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार करण्यासाठी हेमा मालिनी मथुरातील गोवर्धन परिसरातील थेट एका शेतात पोहोचल्या.
शेतात गेल्यानंतर हेमा मालिनी यांनी प्रथम शेतातील गहू कापण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली. त्यानंतर कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वत: उचलून बाजूला ठेवल्या. हेमा मालिनी यांचे हे शेतातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
निवडणूकीच्या रिंगणात स्टटंबाजी करत हेमा मालिनी यांनी पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
