राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रात तातडीची मदत देण्याची विरोधकांची सरकारकडे मागणी
आजचं कामकाज संपण्याच्या आत सरकारकडून विस्तृतपणे निवेदन दिलं जाईल, असं ते म्हणाले. विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची नोंदणी करत असताना विशिष्ट मतदार संघांमध्येच होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात चौकशीचे आदेश देऊन अधिकार्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलं.राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह गंभीर पूरस्थितीवर सरकार बारकाईनं लक्ष ठेऊन असून आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीत नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मदतकार्य वेगानं सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत, याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा ‘एनडीआरएफ’चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली. विधान परिषदेतल्या सदस्यांनाही विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री तसंच अर्थमंत्र्यांशी चर्चा करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. निधीवाटपात कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असंही ते म्हणाले. कामकाज सुरू होताच तातडीचा विषय म्हणून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निधीवाटपाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारनं निधीवाटपात असमानता दाखवली आहे, काही सदस्यांना ५०-६० कोटींचा निधी मिळाला आहे तर काहींना दोन कोटीही मिळाले नाहीत, असं ते म्हणाले. राज्यात आजपर्यंत १ कोटी ४ लाख ६८ हजार ३४९ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजने अंतर्गत पीकविमा भरला आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
दररोज सहा ते सात लाख शेतकरी हा पीक विमा भरत असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टींकडून आलेल्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाच्या चौकशीचा अहवाल एका महिन्यात मागवला जाईल, असं आश्वासन फडनवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. शशिकांत शिंदे यांनी एका तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय उपस्थित केला होता. धार्मिक सौहार्द वाढवणाऱ्या कोणत्याही श्रद्धा आणि परंपरा पाळण्यास सरकारची मनाई नाही. मात्र या प्रथा परंपरांच्या नावाखाली धुडगूस घालता येणार नाही, असा इशारा फडनवीस यांनी दिला. दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर मधील अवैध धंद्यांचा मुद्दा एका तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. वारंवार अवैध धंदे करणाऱ्या लोकांविरूद्ध एमपीडीए किंवा मोक्कासारख्या कायद्याचा वापर केला जाईल, असं आश्वासन फडनवीस यांनी दिलं. अवैध धंद्यात जर पोलीस सहभागी असतील तर त्यांना ३११ कलमाखाली सेवेतून बडतर्फ केलं जाईल, असंही ते म्हणाले. कल्याण-डोंबिवली परिसरात महारेराच्या नोंदणीचा बनाव करून उभारण्यात आलेल्या इमारती नियमित करण्याच्या दृष्टीनं नगरविकास खात्यातर्फे समिती नेमण्यात आली आहे. त्या माध्यमातून यामध्ये घरे घेणाऱ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. निरंजन डावखरे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
