ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका !
नागपुर, दि. ६: राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसह १३० सरपंचपदांसाठीच्या काल झालेल्या निवडणुकीचे बहुतांश निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांना मोठ यश मिळालं असून त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारच्या योजना आणि १५ व्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोचत असल्याचा फायदा पक्षाला या निवडणुकीत झाला असल्याचं ते म्हणाले.येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकींत भाजपा दोन तृतीयांशाहून अधिक जागा जिंकेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायतींसह सरपंचपदांसाठीच्या निवडणुकीतल्या आजच्या निकालांवरुन जनतेचं महायुतीला पाठबळ असल्याचं स्पष्ट होत असून महायुतीची जबाबदारी वाढली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नागपूर जिल्ह्यात १४० ग्रामपंचायतींपैकी ११४ भाजपानं जिंकल्या आहेत. नागपूरमधल्या ३६५ सरपंच पदापैकी २४० पेक्षा जास्त जागांवर भाजपा समर्थित उमेदवार आघाडीवर आहेत. काटोलमध्ये जाहीर झालेल्या ३१ निकालांपैकी २० सरपंचपदाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ८ ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून काँग्रेसनं सर्वाधिक ५ ठिकाणी विजय मिळवला आहे. अकोला जिल्ह्यातल्या १४ ग्रामपंचायतींचे निकाला हाती आले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीनला ३, शरद पवार यांच्या गटाला २ जागा, तर अजित पवार गट, भाजपा आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. यात काँग्रेसनं सर्वाधिक १७ जागा जिंकल्या आहेत. इथं भाजपाला ९ शिवसेना शिंदे गटाला ३, उद्धव ठाकरे गटाला २, राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. गोंदीया जिल्ह्यात दोन ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून महायुतीला १ आणि भाजपाला १ जागा मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतींपैकी भाजपाला १५, ठाकरे गटाला ५, जागा मिळाल्या. सोलापूर जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांना मतदारांनी कौल दिला आहे.
Source – AIR
