पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन
नवी मुंबई, दि. १९: महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये ‘क’ वर्ग महानगरपालिकांत सर्वोत्तम पर्यावरणशील शहर म्हणून नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव शहराच्या नावलौकिकाला साजेसा पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा व्हावा याकरिता नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव सुनियोजित रितीने पार पडावा याकडे बारकाईने लक्ष देत आयुक्तांनी पूर्वतयारीच्या नियोजनाविषयी महानगरपालिकेचे संबंधित विभाग व पोलीस आयुक्तालय यांच्या ३ वेळा आढावा बैठका घेतल्या असून परस्पर समन्वयातून हा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न व्हावा याकडे काळजीने लक्ष दिले आहे. श्रीगणेशोत्सवाच्या सुव्यवस्थित आयोजनाकरिता महानगरपालिका व पोलीस विभाग दक्ष राहून सज्ज आहे.
१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या श्रीगणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देताना आयुक्तांनी यापूर्वीच आवाहन केल्याप्रमाणे श्रीगणेशाची मुर्ती ही शाडू मातीची असावी तसेच ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे पुन्हा एकवार आवाहन केले आहे. प्रामुख्याने श्रीगणेशमूर्तीभोवती सजावट करताना त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल अशा पर्यावरणविघातक गोष्टींचा वापर टाळावा असेही सूचित केले असून श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन नवी मुंबई महानगरपालिकेने जागोजागी मोठया प्रमाणावर निर्माण केलेल्या १४१ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये करावे असे आवाहन आयुक्तांमार्फत करण्यात आले आहे.
विविध समाज माध्यमांतून प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओ छायाचित्रण फितीव्दारे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हे आवाहन केले असून सुजाण नवी मुंबईकर नागरिक श्रीगणेशोत्सव २०२३ यामध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.