मुंबई, दि. ३०: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली, तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितरित्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून तेच पुन्हा मुख्यमंत्री पदि विराजमान होतील अशी अटकळ होती. परंतू, दिल्लीवरून अचानक सूत्र हलली व ऐनवेळी देवेंद्र यांचा पत्ता कट करण्यात आला. एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागे व ते यशस्वी करण्यात फडणवीस यांच्या मोठा वाटा होता. पण ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे फडणवीस पुन्हा सत्तेत आले खरे पण उपमुख्यमंत्री होऊन. भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गेम झाल्याचे मानले जाते.
एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रवास
एकनाथ शिंदे १९८० च्या दशकात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेत दाखल झाले. शाखाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. १९९७ मधे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. २००१ ते २००४ या काळात ते महानगरपालिकेचे सभागृह नेते होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले. त्यानंतर वर्षभरात आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमधे ते सातत्यानं निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर अल्पकाळ विधानसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून काम केल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांनी मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधे ते नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
