..तर निकाल सहा दिवस उशिराने लागेल
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमला जोडलेल्या ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगकडे केली होती. सर्व लोकसभा मतदारसंघांमधील ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करायला जवळपास पाच ते सहा दिवस लागतील, असा दावा आयोगाने केला.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणात सक्षम कर्मचारी वर्ग आवश्यक असल्याचं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. यासाठी मोठ्या सभागृहाची आवश्यकता भासेल. अनेक राज्यांमध्ये आधीच मोठ्या सभागृहांचा प्रश्न आहे, अशा समस्या आयोगानं न्यायालयाला सांगितल्या. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचं प्रमाण ५० टक्क्यांवर नेण्याची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीला निकाल ५ दिवस उशिरा म्हणजेच २३ मे रोजी २८ मे रोजी लागेल, असं आयोगानं न्यायालयाला सांगितलं.
काँग्रेससह २१ विरोधी पक्षांच्या वतीने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ह्या याचिकेत ५० टक्के व्हीव्हीपॅट मोजणी करावी हि प्रमुख मागणी होती. पण व्हीव्हीपॅट मोजण्याच्या विद्यमान पद्धतीत बदल का हवा, याविषयी या याचिकेत कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, असे आयोगाने म्हटले आहे.
व्हीव्हीपॅट स्लीप पडताळून पाहिल्यास निकालाला केवळ तीन ते चार दिवस उशीर होईल. पण निवडणूक आयोगावरील विश्वास आणखी घट्ट होईल, असे २१ विरोधी पक्षांचे म्हणणे होते.
