होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
मुंबई दि.१७: होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. १७ मार्च, २०२२ रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच दि. १८ मार्च रोजी धूलिवंदन व २२ मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
