जगदिप धनखड यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड
देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदिप धनखड यांची निवड झाली आहे. आज झालेल्या मतमोजणीत त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यावर ३४६ मतांनी मात केली. उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान झालं. यावेळी ७८० संसद सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी जगदिप धनखड यांनी ५२८ तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी उत्पल कुमार सिंग यांनी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्द अध्यक्ष असतात. सध्याचे उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतीपदाची मुदत येत्या १० ऑगस्ट रोजी संपत आहे.
