महिला व बालकल्याण विभागाकडून झालाय १०६ कोटींचा घोटाळा : विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडील खात्याकडून मोबाईल खरेदीमध्ये १०६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “महिला व बाल कल्याण विभागाने बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा I7 हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ६ हजार ४९९ रूपयांत हा मोबाईल बाजारात उपलब्ध असताना ८ हजार ८७७ रुपये का दिले गेले? ही अधिकची रक्कम का मोजली? याचे उत्तर द्यावे.” तसेच पॅनासोनिक इलुगा I7 मॉडेल एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च केले मात्र, लोकप्रिय न झाल्याने उत्पादन थांबवले. बाजारात अत्याधुनिक तंत्रज्ञानचे मोबाईल असताना सरकारने न विकलेला स्टॉक अधिकचे २२०० रूपये मोजून विकत घेण्याचा घाट का घातला? घाऊक व्यवहारात सवलत का मिळवली नाही? हे न सुटणारे कोडे आहे.”
धनंजय मुंडे यांनी संबंधित कंपनी बाबतही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “ज्या कंपनीला हे १०६ कोटी रुपये किंमतीचे मोबाईल पुरवठा करण्याचे काम दिले, त्या कंपनीची अधिकृत शेअर कॅपिटल फक्त ५ कोटी ५० लाख आणि पेड अप कॅपिटल केवळ ४ कोटी ९२ लाख ६५ हजार इतकीच आहे. तरी हा व्यवहार कसा केला गेला? हे सर्व आकलन क्षमतेच्या पलिकडे आहे.” पुढे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्देशून म्हणाले की, “यापुर्वी देखील महिला व बाल कल्याण विभागाने मोबाईल खरेदी करताना अनाकलनीयरित्या अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या उत्पादनालाच निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची अट टाकल्याचे मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तरी देखील अशाचप्रकारे खरेदी होत असेल तर कुंपण शेत खातंय हे निश्चित.”
“ठराविक कंपनीला फायदा मिळवा यासाठी महिला व बाल विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट आहे. याआधी झालेल्या इतर भ्रष्ट व्यवहारावरही अद्याप मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली नाही. तुम खाते रहो, हम संभालेंगे… हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे का? #ढोंगीपारदर्शकता” धनंजय मुंडे यांच्या या आरोपांना पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे. कारण चिक्की घोटाळ्यातही असेच आरोप मागे झाले होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप करून धनंजय मुंडे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
