पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी
औरंगाबाद, दि.६: औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्याच्या संबंध परिसरात भीषण आग लागली होती. यावेळी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने ही आग विझवण्याचे काम केले. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व दिवंगत आर. आर. पाटील फाऊंडेशन चे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पुरातत्व खात्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत आपला रोष व्यक्त केला आहे. वाचा विनोद पाटील नेमकं काय म्हणाले आहेत.
करोडोंचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पुरातत्व खात्याने चक्क ‘देवगिरी’ किल्ल्याला आग लावली..
१. गडाच्या संवर्धनासाठी, उत्खनन करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च झाला. गावकऱ्यांनी त्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. तो भ्रष्टाचार उघड पडू नये म्हणून आग लावण्यात आली.
२. प्रत्येकवर्षी गडाच्या परिसरातील गवत हराशी पद्धतीने विकल्या जायचं, या माध्यमातून गडाची स्वच्छता ही होत असे. परंतु यावर्षी या गवताचा वापर आग लावण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी झाला.
३. किल्ल्यावर व परिसरात अनेक तरुण विविध दुकाने थाटून आपला व्यवसाय करतात व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सदरील दुकानांचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना या आगीत त्यांचे दुकाने जाळण्यात आली.
४. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आलेल्या गाडीसाठी रस्ता सुद्धा नव्हता. परंतु प्रत्यक्षात कागदोपत्री करोडो रुपयांचे रस्ते झाल्याच्या नोंदी आहेत. या आगीमुळे हा कारभार तरी उघड पडला.

यासह प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे अनेक मुद्दे आहेत, जे सर्व आम्ही वरिष्ठ पातळीवर मांडणार आहोत आणि याबाबतीत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला करणार आहोत.
पोलीस निरीक्षक आडे मॅडम यांनी आग विझविण्यासाठी खूप मेहनत घेतली, आम्हाला त्वरित संपर्क साधून पाण्याचे टँकर उपलब्ध केले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
याउलट पुरातत्व खात्याने आग विझविण्यासाठी कुठलेही सहकार्य केले नाही, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. यातूनच त्यांचा हेतू स्पष्ट होतो.
दौलताबाद हे माझं मूळ गाव आहे, दौलताबाद गावात व देवगिरी किल्ल्याच्या परिसरातच मी लहानाचा मोठा झालो, गाव व किल्ला आमची अस्मिता आहे. याठिकाणी जर कोणी भ्रष्ट काम करत असतील, माझ्या गावकऱ्यांचे दुकाने जाळून त्यांना बरबाद करण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. त्यांना दंड मिळेलच!
– विनोद नारायण पाटील, दौलताबादकर
