देवेंद्र फडणवीस पुनः एकदा राज्यपालांच्या भेटीला; म्हणाले “…हे प्रकार अघोषित आणिबाणीसदृश्य आहेत”
मुंबई: विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस आज पुनः एकदा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर आले होते. पत्रकारांची गळचेपी होत असल्याची तक्रार करत या बाबतचे एक निवेदन देण्यासाठी ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत राज्यपालांना भेटायला आले होते. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, “राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे”.
दोन आठवड्यांपूर्वी एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीला चुकीचे वृत्त प्रसारित केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या संदर्भात ते म्हणाले की, “एखादं वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत,”
आजच्या राज्यपाल भेटी समयी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा इत्यादी नेते उपस्थित होते.
माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा !
मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी माझे सहकारी विनोद तावडेजी, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढाजी उपस्थित होते. pic.twitter.com/VJMfWc6a7h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 28, 2020
